‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश   

नवी दिल्ली : ‘एनसीईआरटी’च्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाही यांचे सर्व संदर्भ काढून टाकले आहेत. तर, भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सारख्या योजनांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला आहे. ही नवी पुस्तके या आठवड्यात प्रकाशित झाली.
 
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफएसई) २०२३च्या अनुषंगाने ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, शालेय शिक्षणामध्ये भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञान व्यवस्था आणि स्थानिक संदर्भांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
 
याबद्दल ‘एनसीईआरटी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे केवळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये येणे अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र, वगळलेला अभ्यासक्रम दुसऱ्या भागात समाविष्ट केले जाईल की नाही याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यापूर्वी ‘एनसीईआरटी’ने मोगल आणि दिल्लीच्या सुलतानशाहीचे काही संदर्भ कमी केले होते. त्यामध्ये तुघलक, खिलजी, मामलुक आणि लोधी राजघराण्यांचा समावेश होता.
 
आता मात्र, त्यांचे सर्वच संदर्भ काढून टाकले आहेत. समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन या प्राचीन भारतीय राजघराण्यांवरील नवीन अध्याय समाविष्ट केले आहेत. त्याबरोबरच हिंदू धर्मासह इस्लाम, ख्रिाश्चन धर्म, यहुदी धर्म आणि झोरोस्ट्रियन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख धर्म यांच्यासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या जागा आणि तीर्थक्षेत्रांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या अवतरणाचा संदर्भ देण्यात आला आहे.
 

Related Articles